NGCPR TRAINING (DAY 2)

रयत शिक्षण संस्थेचे,
न्यू इंग्लिश स्कूल पळशी.
ता. खंडाळा जि. सातारा.
Nauroji Godrej Center For Plant Research (NGCPR)

कार्यशाळा (दिवस दुसरा)
विषय- Communication, Education And Public Awareness For Climate Action and Biodiversity Conservation. (१२ जुलै २०२३)

प्रशिक्षणार्थी शिक्षक- श्री.हेमकांत शंकरराव किरवे (उपशिक्षक)

मार्गदर्शक-१) सौ.क्रांती यार्दी मॅडम
        २) श्री. शिवम सर

प्रस्तावना-
      आज बुधवार दिनांक १२ जुलै २०२३ रोजी अजनुज येथे NGCPR मार्फत Biodiversity Conservation बाबत शिक्षकांची कार्यशाळा पार पडली. यामध्ये NGCPR मधील प्रमुख शास्त्रज्ञ सौ.क्रांती यार्दी मॅडम यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले यावेळी सौ यार्दी मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व NGCPR मधील सर्व सहकाऱ्यांची ओळख करून दिली.

क्षेत्रभेट-
     आज बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी NGCPR यांच्यामार्फत एका क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. या क्षेत्रभेटीदरम्यान गोदरेज कंपनीच्या स्वमालकीच्या जागेमधील जैवविविधतेचे दर्शन घेता आले. यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती झाडे झाडांच्या बिया तसेच जंगली बदक काही पक्षी जसे की हरियाल खंड्या यांचे दर्शन झाले. गवताळ प्रदेश म्हणजे नक्की काय हे आज पहायला मिळाले त्याचप्रमाणे बाभळीचे जंगल आणि काही खुरट्या स्वरूपातील वनस्पती यादेखील पाहायला मिळाल्या पावसाची शक्यता वर्तवणारा पावश्या पक्षी देखील पाहायला मिळाला. गुंजेचे झाड व कवठाचे झाड पहायला मिळाले.
       भेटी दरम्यान विविध प्रकारच्या रानभाज्या व त्यांचे औषधी उपयोग जाणून घेण्यात आले. यावेळी देवराई ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी NGCPR ने केलेले प्रयत्न खूप प्रशंसनीय आहेत. आज प्राथमिक स्वरूपात असणारी देवराई भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वृक्षांच्या रूपात नक्कीच आपणांसमोर येईल या भेटीदरम्यान परदेशी वृक्ष तसेच देशी वृक्ष पाहण्याचा योग आला. पाण्यामधील परिसंस्था पाहत असताना त्या परिसंस्थेमधील प्रत्येक घटकाची एकमेकांशी होणारे अंतर क्रिया समजावून घेता आली. पूर्वी कपडे व केसांच्या स्वच्छतेसाठी वापरले जाणारे रिठे व त्याचे झाड पाहण्याची संधी मिळाली.
       क्षेत्रभेटीदरम्यान विविध प्रजातींच्या प्राणी आणि वनस्पती यांची शास्त्रीय माहिती दिल्याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थींनी सौ क्रांती यार्दी मॅडम यांचे आभार मानले.

कृती 1-
     क्षेत्रभेटीनंतर सर्व प्रशिक्षणार्थींना एक कृती करण्यासाठी तीन गटात विभागले गेले. तदनंतर प्रत्येक गटाला जंगल परिसंस्था, जलीय परिसंस्था व गवताळ प्रदेशातील परिसंस्था या परिसंस्थांमधील समस्या लिहिण्यास सांगण्यात आले व त्यासाठी वीस मिनिटांचा वेळ देऊन एका कार्डशीट पेपरवर सदर कृती गटात करण्यासाठी सांगितले. दिलेल्या वेळेनंतर प्रत्येक गटाची सादरीकरण सर्व प्रशिक्षणार्थींसमोर घेण्यात आले व या कृती मधून निघणारा निष्कर्ष म्हणजेच शाश्वत विकास होय हे सर्वांना सांगण्यात आले.

कृती 2-
     NGCPR चे वैज्ञानिक श्री शिवम सर यांनी दुसऱ्या कृतीदरम्यान सर्व प्रशिक्षणार्थींना दोन चटयांवर यादृच्छिक पद्धतीने उभे केले. तदनंतर प्रत्येक पायरीनंतर प्रशिक्षणार्थी ज्या चटईवर उभे होते त्या चटईची 25% च्या पटीत टप्प्याटप्प्याने घडी घालण्यात आली. सर्व प्रशिक्षणार्थींना चटईवर उभे राहण्यासाठी जेवढी जागा आहे तेवढी व्यापण्यास सांगितले. प्रत्येक टप्प्यावर चटईची घडी घालत असताना चटईवरील जागा कमी होत होती आणि प्रशिक्षणार्थी मधील अंतर कमी होत होते. कृतीच्या शेवटी अशी वेळ आली की चटईवरील जागा खूप कमी राहिल्याने प्रशिक्षणार्थींना त्या चटईवर आपला तोल सांभाळणे कठीण झाले व एकेक प्रशिक्षणार्थी चटई क्षेत्राच्या बाहेर पडू लागले.
तात्पर्य-  जंगलांमध्ये तसेच पर्यावरणामध्ये व नैसर्गिक स्त्रोतांमध्ये मानवाचा वाढता हस्तक्षेप एखादी प्रजाती नष्ट करू शकतो किंवा पर्यावरणामधून तिला हद्दपार करू शकतो.

आभार-
     आज प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी सर्व प्रशिक्षणार्थींकडून अभिप्राय भरून घेण्यात आला तसेच प्रातिनिधिक स्वरूपात प्रशिक्षणाबद्दल आपले मत श्री गांगुर्डे सर यांनी व्यक्त केले व अतिशय अभ्यासपूर्ण व माहिती पूर्ण असे दोन दिवसीय प्रशिक्षण अतिशय उत्साहात पार पडले. त्याबद्दल NGCPR च्या सर्व टीमचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

NGCPR TRAINING (DAY 1)